उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त -प्राचार्य डॉ.गजानन पाटील, बदलीसाठी केले वारंवार प्रयत्न

जळगाव – जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करीत असतांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राजकीय हस्तक्षेप जास्त असल्याचे खळबळजनक वक्तव्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत अनौपचारिकरित्या केले. मी बदलीसाठी देखील इच्छुक असून शासनाला मी वारंवार विनंती केली आहे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. दरम्यान, प्राचार्य डॉ.पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींना भेटण्यास व बोलण्यास टाळाटाळ केली. 

वास्तविक पाहता पत्रकार परिषद ही शिक्षणाची वारी या विषयाशी निगडीत असतांना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने पत्रकार देखील आश्‍चर्य चकीत झालेत. प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्यावर जिल्ह्यातील कुठल्या राजकीय पदाधिकारी किंवा प्रतिनिधींनी दबाव आणला किंवा कुठल्या राजकीय व्यक्तीने प्राचार्य डॉ.पाटील यांची अडवणूक केली हे गुलदस्त्यातच ठेवले असून जिल्ह्याचा शैक्षणिक विकास झपाट्याने होत असतांना प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी राजकीय हस्तक्षेपाचा अडथळा असल्याचा जावई शोध कसा लावला या मागचे कोडे उलगडले नाही.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत शिक्षकांचे नाविण्यपुर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून शिक्षणाची वारी हे प्रदर्शन गेल्या तीन वर्षापासून आयोजित करण्यात येते. गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण हे या वर्षीच्या शिक्षणाच्या वारीचे उद्दीष्ट आहे. यासंदर्भात पुष्पलता गुळवे विद्या निकेतन विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांवर एक अनोखे आसूड ओढले.
अनाधिकृतपणे होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, फलक लावून शहर विद्रुप करणे हा गंभीर गुन्हा आहे.
शहर विद्रुप करणे हा उच्च न्यायालयाचा देखील अवमान आहे. याचे देखील भान विसरुन प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी शिक्षणाच्या वारी या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार होर्डींग्ज व बॅनर्स च्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले. वास्तविक या कार्यक्रमाचा शिक्षण क्षेत्रातील केंद्रबिंदू असणार्‍या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा हे उद्दीष्ट असतांना त्या दृष्टीने प्रसिध्दी व प्रचार करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी शासनाने 40 लाख रुपये निधी दिला आहे. परंतु प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केल्याने राजकीय नेते डॉ. पाटील यांना या कार्यक्रमास मदत करतील काय ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  या सर्व प्रकाराने डॉ. पाटील यांनी वेगळ्या प्रकारे ‘यु-टर्न’ घेतल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खडबळ उडाली आहे.

 

1+