उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

खोट्या जाहिरातींसह बातम्यांमुळे विद्यार्थ्यांची दिशा अकॅडमी कडून होतेय फसवणूक

दिशा अकॅडमी विद्यार्थ्यांना देत आहे धोका…
उच्च न्यायालयात दाखल केली जाणार जनहित याचिका
जाहिर नोटीस देऊन क्लासेच्या संचालकांना मागे घ्यावी लागणार जाहिरात 
जळगाव – देशभरात चुकीच्या जाहिराती छापून युवकांच्या करीअर सोबत उघडपणे खेळ खेळून त्यांच्या भविष्याची राख रांगोळी करीत असल्याचा प्रकार दिशा अकॅडमीकडून होत असल्याचा गैरप्रकार उघडकीस येत आहे. एकीकडे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतांना खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात छापून विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत पैसे कमवण्याचा गोरखधंदा दिशा अकॅडमीतर्फे केला जात आहे. हा गैरप्रकार राजरोस सुरू आहे. या सर्व विषयावर दै. बातमीदारसह इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी शहरातील नामवंत क्लासेसच्या संचालकाकडून देखील या जाहिरात व बातमीची खातरजमा करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यानुसार विद्यार्थ्यांना खोट्या व फसव्या जाहिरातीतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणार्‍या दिशा अकॅडमीचा भांडाफोड करणारा हा विशेष रिपोर्ट. 
शहरातील प्रभात चौक आणि ख्वॉजा मिया चौकात JEE MAIN, MH CET च्या विद्यार्थ्यांसाठीचे दिशा करीयर अकॅडमी हा खाजगी क्लास सुरू आहे. 20 जानेवारी रोजी या क्लासेच्या संचालकांनी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरात शहरातील नामवंत वर्तमानपत्रात जाहिरात छापली आहे. ज्यात दिशा अकॅडमीचे संचालक सतीश कांतीलला पुरोहित व विकास मणिलाल बहादुर सिंह परिहार यांनी आपल्या क्लासमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या फोटोसह परिक्षेतील गुणांचा उल्लेख केला आहे. ज्यानुसार त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना मिळालेले गुण हे सर्वात जास्त आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे गुण त्यांनी दिले आहेत, ते गुण टक्केवारी नुसार मांडले आहेत. त्यामुळे टक्केवारीनुसार जर त्यांची गुणवत्ता गृहीत धरली तर ती चुकीची असल्याचा दावा अनेक क्लास चालकांनी केलाय. हा प्रकार केवळ जाहिरातीच्या माध्यमातूनच नव्हे तर 24 जानेवारी रोजी क्लासने दिलेल्या बातमीतून देखील छापला गेलाय. संचालकांनी वर्तमानपत्रात दिलेल्या बातमीनुसार त्यांच्याकडे क्लासेसला येणारा विद्यार्थी पुष्पक सराफ यांना 97.20 टक्के मिळाले असून त्याचा प्रथम क्रमांक आल्याची चुकीची माहिती जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या क्लासेसमध्ये शिकणारे जवळपास 23 विद्यार्थ्यांना देखील 97 टक्क्यांपासून 71 टक्क्यांपर्यंत गुण मिळाल्याचे जाहिर केले आहे. 2019 पासून NTA JEE परिक्षांचे निकाल हे टक्क्यांमध्ये नव्हे तर पर्सेंन्टाइल मध्ये मार्क्स दिले जातात. त्यामुळे जाहिरात व बातमीमध्ये छापलेले विद्यार्थ्यांचे गुण खोटे व चुकीचे असल्याची माहिती आता उघड झाली आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या (NTA) माध्यमातून जानेवारी 2019 मध्ये JEE MAIN 2019 पेपर 1 ही परीक्षा घेतली गेली होती. ज्यात जळगावसह संपुर्ण भारतातून जवळपास 8 लाख 74 हजार 469 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील केवळ 15 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत.
टक्के (पर्सेंटेज) व पर्सेंटाइल मधील फरक नेमका काय आहे
दहावी अथवा बारावीची परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी दिली जाते. याचा अर्थ असा असतो की विद्यार्थ्याला मिळालेले गुण हे एकुण गुणांच्या तुलनेत किती आहेत. तर पर्सेंंन्टाइल म्हणजे किती विद्यार्थी आहेत ज्यांचे गुण तुमच्यापेक्षा कमी आलेत. या पर्सेंन्टाइलसाठी एक फॉर्मुला देखील असतो, जो प्रत्येक गणित शिकविणार्‍या शिक्षकासह खाजगी क्लासेसच्या चालक मालकांना माहिती आहे. तो फॉर्मुला पुढील प्रमाणे…(100 पर्सेन्टाइल) X परीक्षा मध्ये बसलेले विद्यार्थी / 100
दिशा अकॅडमीची नोंदणीनुसार समोर आलेली माहिती पुढील प्रमाणे 
मध्ये प्रदेशातील सतना या शहरातील मिल्ट्री एरीयात वास्तवास राहणारे विकास मणिलाल बहादुर सिंह परिहार व सतीष कांतिलाल पुरोहित यांनी नोंदणी क्रमांक 1620800310301340, (01/04/2016) नुसार दिशा अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. केवळ दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळात या क्लासेसवर जीएसटीची रेड देखील पडल्याची चर्चा सुरू आहे.
संचालकांकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ही जाहिरात एजंसी व त्यासंदर्भात काम करणार्‍या मनोज ग्राफिक्स यांच्या चुकीमुळे प्रकाशित केली गेल्याच सांगितले गेले मात्र जर जाहिरात नजर चुकीने छापली असेल तर त्यानंतर म्हणजेच 24 जानेवारी रोज प्रसिध्द झालेल्या बातमीत देखील तोच प्रकार पुन्हा कसा घडला, असा प्रश्‍न यावेळी उपस्थित होतोय. हा विषय क्लासमधील विद्यार्थ्यांसाठी देखील चर्चेचा बनला असून गणित शिकविणार्‍या शिक्षकाकडूनच असा चुकीचा प्रकार कसा घडू शकतो, अशी जोरदार चर्चा रंगत आहे.
0