मुंबई शिक्षण

बालकांच्या नांवे भ्रष्टाचार करणा-या लोकप्रतिनिधी व अधिका-यांवर कारवाई  करण्याची मागणी

(सिद्धांत गाडे) उल्हासनगर  – उल्हासनगर महानगरपालिका म्हणजे लूटारूंना उपलब्ध असलेला खुला खजिना.कोणीही यावे आणि लुटून जावे.त्यात रक्षकच भक्षक निघाल्यावर तर दरोडेखोरांची मज्जाच मज्जा.येथे माझ्या सारख्या जागल्याची भूमिका बजावणारा कबाबमे हड्डी,मानला जातो. बालकांच्या नांवे भ्रष्टाचार करणा-यालोकप्रतिनिधी व अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी केली आहे.
यासंदर्भात मालवणकर यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करण्याचीमागणी केली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने बालवाडी व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी 20 लाख 53 हजाराची निविदा काढली आहे. तशी ती नित्यनेमाने दरवर्षी काढली जाते. सदर निविदेचे कारण काय तर- बालवाडी व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅग,डब्बा व पाण्याची बाॅटल पुरविणे.आणि गंमत म्हणजे उल्हासनगर महापालिकेच्या अखत्यारीत एकही बालवाडी व अंगणवाडी येत नाही.महापालिकेचे त्यावर नियंत्रण नाही.
अंगणवाडी ही योजना केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंतर्गत चालविण्यात येते.विद्यार्थ्यांना साहित्य व सुविधा पुरविणे, सेविका मदतनीस यांचे मानधन,अंगणवाडीच्या जागेचे भाडे ही सर्व शासनाची जबाबदारी असून ती  शासनातर्फे व्यवस्थित पार पाडली जाते.त्यावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प च्या अधिका-यांचे नियंत्रण असते.
असे असताना उल्हासनगर महापालिकेच्या महिला व बाल विकास समितीला आवश्यकता नसताना दरवर्षी 20 लाखाहून अधिक रकमेचे साहित्य पुरविण्याची निविदा काढली जाते.विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निदर्शनास सदर घोटाळा मी परवाच आणून दिला.त्यामुळे तेही अचंबित झाले. सदर निविदा काढण्याची आवश्यकता नाही,ते आपले काम नाही, असे त्यांनी माझ्या समक्ष संबंधित अधिका-यास ठणकावून सांगितले. असे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यास माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याचे मनोबल वाढते,या आधी मात्र असा अनुभव येत नसे.
गेल्या पाच वर्षांत महिला व बाल कल्याण समितीने अशाप्रकारे बालवाडी व अंगणवाडीसाठी काढलेल्या निविदा, त्यांचे कार्यादेशही व ते साहित्य मिळालेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती मी अधिकृतपणे मागवली आहे. आयुक्तांनीही ही माहिती महिला व बाल कल्याण समिती व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून मागवून पडताळणी केल्यास किमान एक कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस येईल,याची मला खात्री आहे. असेही मालवणकर यांनी सांगितले.
याबाबत मी महाराष्ट्र शासन व आयुक्त यांना विनंती करीत आहे की, अंगणवाडी व बालवाडीच्या बालकांच्या नावे चाललेला हा भ्रष्टाचार त्वरित चौकशी करून लोकांना  व या भ्रष्टाचारात सहभागी असलेले लोकप्रतिनिधी, ठेकेदार व अधिकारी यांच्या विरोधात शासकीय निधीचा अपहार व गैरवापर केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी मालवणकर यांनी केली आहे.
0