मुंबई राजकीय

राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फलक फडकवत केला निषेध…

मुंबई –  बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडवल्याप्रकरणी गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी हा घोटाळा समोर आणला. त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय घेऊन ३४२ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील एका निर्णयातून राज्य सरकारचे ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर पुण्यातीलच बालेवाडी येथील दुसऱ्या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मैदानाच्या आरक्षित जागेवर ३०० कोटींची इमारत उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी हा मुद्दा अर्थसंकल्पातील अनुदानाच्या चर्चेदरम्यान उपस्थितही केला होता. शिवाय याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली.

भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस सरकारने सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले तर राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे. त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारविरोधात गुरुवारी राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध केला.

दरम्यान विरोधी पक्षांनी संबंधित मंत्र्यांच्या भ्रष्टाचारविषयी बोलण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांकडे रितसर मागितली मात्र दिलेली कागदपत्र अपुर्ण असल्याचे कारण देत बोलण्याची परवानगी नाकारल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. ही लोकशाहीची थट्टा चालवली असल्याचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार म्हणाले. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांच पाप उघड करण्याची संधी द्यावी. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये असे सांगितले. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी व संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी नियमावर बोट ठेवल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला त्यामुळे १५ मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

0