उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

जैन उद्योग समुहाचे दातृत्व आणि संस्कार आदर्शवत : सुरेशदादा जैन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल सेकंडरीची सुरवात; भोईटे शाळेचे झाले नुतनीकरण

जळगाव दि. ११ : जैन उद्योग समूहाचे कार्य समाजाभिमुख असून संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी सुसंस्कारीत आणि उच्चशिक्षित पिढी घडविण्यासाठी मार्गदर्शक उपक्रम सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या शाळेला जैन उद्योग समूहाने पुरुज्जीवीत केले आहे. गोर गरीबांची मुले इथे उच्च शिक्षण घेणार आहेत. समाजाला सातत्याने देत राहणं हा जैन परिवाराचा संस्कार आहे, त्यामुळेच जळगाव शहरात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे, शहराच्या सर्वांगिण विकासासाठी जैन उद्योग समुहाच्या पाठीशी उभे रहा  असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले.

महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या दादासाहेब काशीनाथ त्र्यंबकराव भोईटे विद्यालयाचे नुतनीकरण केल्यानंतर तिच्या अनावरण प्रसंगी सुरेशदादा जैन बोलत होते. भोईटे विद्यालयात आता अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (सेकंडरी) सुरू झाली आहे. आज झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, संघपती दलिचंद जैन, गिरधारीलाल ओसवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. सुभाष चौधरी, अनुभूती स्कुलच्या संचालिका निशा जैन, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, डी. एम. जैन, डॉ. सुनील महाजन, ललित कोल्हे, नितीन बरडे, अनंत जोशी, मंगला चौधरी, गायत्री राणे, प्राचार्या रश्मी लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात आले.

उद्घाटनपर भाषणात सुरेशदादा जैन यांनी जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, जळगाव शहरातील भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान आणि अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल भाऊंच्या प्रेरणेतूनच लोकांसाठी उभी राहीलेली आहेत. अशा या कार्यांसाठी महापालिकेसह सर्वांनीच राजकारण बाजुला सोडुन जैन उदयोगाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शिक्षण आणि संस्कारातून मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे हे काम आहे. ते सामाजिक दायित्वातून स्वीकारले गेले पाहिजे. या शाळेच्या आत प्रवेश केल्यानंतर मुंबई किंवा विदेशातील शाळेत प्रवेश केल्याचा अनुभव येत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान आज शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी योजना आखण्याच्या गोष्टी करत आहेत, मात्र भवरलालजी जैन यांनी २५ वर्षांपूर्वी ठिबक सिंचनाच्या आणि जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या विकासाचे कार्य हाती घेतले असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

जैन उद्योग समुहामुळे शाळेचा कायापालट : आमदार सुरेश भोळे

आमदार सुरेश भोळे म्हणाले, शिक्षण हे सध्या महाग झाले आहे. शहरातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी महापालिकेची असते, ते लोकसहभागातून दिले गेले पाहिजे यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यायला हवे. जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून या शाळेचा कायापालट झालेला आहे. येथे संस्कारीत आणि मुल्यवर्धित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सत्याच्या रस्त्यावर चालायचे, त्या रस्त्यावर गर्दी कमी असते, पण काम केल्याचे समाधान मिळत असल्याची शिकवण भवरलालजी जैन यांनी दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

चांगल्या उपक्रमासाठी पाठींबा द्यावा – निशा जैन

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमधील गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून महानगरपालिकेने भोईटे शाळेची इमारत अनुभूती स्कूलच्या विस्तारासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करत अनुभूती स्कुलच्या संचालिका निशा जैन म्हणाल्या की, भवरलालजी जैन यांच्याकडे दुरदृष्टी होती. त्यांनी स्वत:, कंपनीच्या बरोबर समाजाचा विकास कसा होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्याचपद्धतीने आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतूनच अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल गोरगरींबासाठी सुरू करण्यात आली. सुसंस्कृत नागरिकच देश घडवू शकतो, यासाठी शैक्षणिक संस्कार आणि मुल्यांची जोपासना करता आली पाहिजे. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल (सेकंडरी) मध्ये आठवी ते दहावीचे वर्ग भरणार आहेत. पुढे बारावी पर्यंतची सुविधा केली जाणार आहे. जैन उद्योग समूह सातत्याने समाजासाठी चांगले उपक्रम राबवत आलेले आहे, यासाठी समाजातील घटकांनी देखील पाठींबा द्यायला हवा.

महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे म्हणाले, जैन उद्योग समुहाने महापालिकेचा केलेला कायापालट ही आनंददायी बाब आहे. जागेचा चांगला सदुपयोग होत आहे, याचा शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना फायदा होईल. वीस वर्षांनंतर येथील विद्यार्थी समाजातील आदर्श नागरिक म्हणून पुढे येतील असा आशवाद त्यांनी व्यक्त केला.

मानवतेला  अर्पण

जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचा समाजाप्रती व्यापकदृष्टीकोन होता. तळागाळातील गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापना केली. मानवतेला समर्पित असलेली त्यांची ही भावना व्यासपीठावरील बॅकड्रॉपवर अधोरेखित करण्यात आली होती.

पालकही गहिवरले

यावेळी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना आपल्या पाल्याला मिळत असलेल्या गुणात्मक आणि संस्कारात्मक शिक्षणाचा अभिमान असल्याचे सांगत पालक गहिवरले. सिमा खैरनार म्हणाल्या, आमची परिस्थिती बेताची आहे. उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. चांगले शिक्षण मिळावे हे स्वप्न होते, ते भवरलालजी जैन यांच्यामुळे पुर्णत्वास येत आहे. माझी मुलगी भाग्यश्री या शाळेत नववीत शिक्षण घेत आहे. येथील वातावरणात तिचे भवितव्य उज्ज्वल होईल याची मला खात्री आहे. १०वीत असलेल्या मयुरचे पालक विजय कोळी म्हणाले, श्रीमंत व गरीब यातील दरी कमी करण्यासाठी शैक्षणिक विकासाबरोबरच आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी भवरलालजी जैन यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. मुलांना येथे चांगल्या सवयींची शिकवण दिली जाते. माझा मुलगा घरात व्यसन करणाऱ्यांना विरोध करतो ही गोष्ट खुपच सुखावणारी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी कृष्णा मराठे (९वी), पुजा इथापे (१०वी) या विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. तर प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी आभार मानले. सुरवातीला अनुभूती स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आणि सरस्वती वंदना सादर केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्यावर आधारलेले शिक्षिका शलाका निकम, संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनात तयार केलेले कीर्तन सादर केले, त्याला उपस्थितांनी उर्त्स्फूत दाद दिली.

0