उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

एटीएम फोडून चोरटयांनी लांबविली साडे नऊ लाखांची  रोकड भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे  येथिल घटना

भुसावळ – तालुक्यातील पानाचे कु-हा येथे  बस स्टॅन्ड जवळील आय. डी. बी. आय. बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यानी  साडेनऊ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , कुऱ्हे पानाचे बस्थानक परिसरात व्यापारी संकुलात असणाऱ्या आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीनला गॅस कटरने कापून आतील जवळपास साडेनऊ लाखांची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेली . हि घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी फैजपूर उपविभागीय अधिकारी संजय देशमुख,तालुका पोस्टचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे देविदास पवार, शहर पोलीस स्टेशनचे बाळासाहेब ठुबे ,उपनिरीक्षक गजानन करेवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . यावेळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान ह्या चोरीची घटना पहाटे ३ ते ६ वाजेदरम्यान झाली असल्याचा पोलिसांचा अंदाज असून चोरटयांच्या शोधासाठी जिल्ह्यात पथके रवाना करण्यात आली असून नाकाबंदी ठेवण्यात आली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

0