कल्याण मुंबई

कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या; मुलगी अल्पवयीन

भिवंडी (अरूण पाटील  ) – कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे. दोघांचे मागील १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतु, घरच्यांच्या वाढत्या विरोधामुळे दोघांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

              ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील पडघा  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात घडली आहे. गणेश नकुल भोये (वय 21 रा, मालबिडी ) असे मुलाचे नाव असून, मुलगी अल्पवयीन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रेमीयुगलाची वर्षभरापूर्वी एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ते दोघेही एकमेकांना गुपचुप भेटत होते. मुलगी आठवीच्या वर्गात शिकत होती. तर, गणेश हा वडपे येथे गोदामात कामाला होता. या दोघांच्या प्रेमाची माहिती मुलीच्या आई-वडिलांना लागताच त्यांनी या प्रेमाला तीव्र विरोध केला. त्यामुळे हतबल झालेल्या मुलीने याबाबतची माहिती प्रियकर गणेशाला दिली. दोघांनी शनिवारी दुपारी घर सोडले होते. त्यानंतर शाळेत गेलेली मुलगी उशिरापर्यंत घरी परत आली नाही. म्हणून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला.
              ‌मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी थेट मुलीच्या प्रियकर गणेश याचे घर गाठले. त्याच्या आई-वडिलांना आमची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यावेळी गणेशच्या आई- वडिलांनीही आमचा मुलगाही घरात नाही असे सांगितले. दोन्ही मुले बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळच्या सुमारास जंगलात कंटोळे(एक फळभाजी )  गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरांना एका वावळ्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचेही मृतदेह लटकलेले दिसले. त्याची माहिती गावाच्या पोलीस पाटील अंकिता मुकेश पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पडघा पोलीस ठाण्यात खबर दिली. पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय राकेश लहांगे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन प्रेमी युगुलाचे मृतदेह झाडावरून उतरवले.

           घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनाचे कायदेशीर सोपस्कार पुर्ण केल्यानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
0