आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कृषी क्रिडा जळगांव पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ सामाजिक

जळगाव पिपल्स बँकेच्या अनागोंदी कारभाराने ठेवीदार संकटात!

ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरुच; संचालक मंडळाची दमछाक

जळगाव ;- रिझर्व्ह बँकेने जळगाव पिपल्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावल्यामुळे बँक संचालक मंडळाच्या अनागोंदी व अव्यवहार्य कारभारावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरु असल्याने बँक संचालक मंडळाची  व बँक प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे.
बँकांची व आर्थिक जगताची अस्थिरतेची परिस्थिती  असल्याचा खुलासा बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका व्हिडिओद्वारे  केला असून बँकेकडून दोन वेळा तांत्रिक चुका झाल्यामुळे बँकेला आरबीआयने 25 लाखांचा दंड ठोठावला असल्याचे कबुल केले आहे. मात्र हा आकारण्यात येणार्‍या दंडाची रक्कम संचालक मंडळाच्या खिशातून वसूल केली जाते कि, बँकेचे हजारो ठेवीदार, शेकडो शेअर्स धारक यांच्या पैशातून केली जाते? कि आणखी ठेवीदारांना देण्यात येणार्‍या व्याजाच्या रकमेत कपात करून हि उणीव भरून काढली जाते कि, लाभांश कमी करून ही तूट भरली जाते का? याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.
या व्हिडीओमध्ये बोलताना भालचंद्र पाटील म्हणाले कि,जळगाव पीपल्स बँकेने कर्जासंबंधी निर्देशांचे पालन न केल्याने आरबीआयने 25 लाखांचा दंड केल्याचे मान्य करीत रेरा ,मद्यविक्रीस 500 फुटांपर्यंत बंदी, जीएसटी, नोटबंदी आदी कारणांमुळे कर्जहफ्त्यांचे सुलभीकरण करण्यासाठी कर्जदारांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे हा दंड झाल्याचा खुलासा श्री.पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. बँकेची स्थिती भक्कम असून मार्च 2020 पर्यंत त्रूट्याचे  निराकरण केले जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 31 मार्च 2018 अखेर आरबीआयने इन्स्पेक्शन केले असता  बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे नमुद केले आहे. जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकांवर मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 तरतुदींनुसार हा दंड आकारण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.

ठेवीदारांच्या हितासाठी विवरण जाहीर करावे 

बँकेतून दररोज किती ठेवी ठेवण्यात येतात किती ठेवी काढल्या जातात यासाठी बँकेने ठेवीदारांचे हितासाठी विवरण जाहीर करावे. जर बँक भक्कम असेल तर बँकेला दररोज खुलासे करण्याची गरज काय असा सवाल ठेवीदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते ठेवीदारांच्या हितासाठी एकवटले असल्याचे दिसून येत आहे. जर बँक भक्कम स्थितीत असल्याचे बँकेकडून सांगितले जात असले तरी दररोज बँकेकडून माध्यमांमधून जाहिरात तथा खुलासे सादर करण्याची गरज काय असा सवाल उपस्थित होत आहे. संचालकांकडून झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम सुरु असून खातेदारांच्या रोषाला चेअरमन व संचालक मंडळ यांना सामोरे जावे लागत आहे.

बँक असो.कडून अनोखा खुलासा 

जळगाव पीपल्स बँकेला 25 लाखाचा दंड आकारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना जळगावजिल्हा अर्बन  को. ऑ . असोसिएशनने प्रिंट मीडियातून खुलासा केला आहे कि प्रिंट मीडिया अथवा सोशल मीडियात येणार्‍या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन करीत असताना तेच प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचा आधार घेऊन आवाहन करत असताना हा अनोखा खुलासा केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ऑडिटरांच्या चुकीने बँक व पतपेढ्या डबघाईस – गजानन मालपुरे 

सहकार क्षेत्रात काम करीत असताना अडचणींवर मात करण्यासाठी तडजोड करावी लागते. यासाठी छोट्या मोठ्या चुका ह्या होत असतात. अनेक बँका आणि पतपेढ्याना ‘अ’ वर्ग दिला जात असल्याने ऑडिटरांकडूनच उल्लू सरळ करण्याचे काम केले जात आहे. चुकीचे ऑडीट वर्ग दिल्याने जळगाव जिल्ह्यासह राज्यातील पतपेढ्या बुडण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख गजानन मालपुरे यांनी दै.बातमीदारशी बोलतांना व्यक्त केली.

माध्यमांची मुस्कटदाबी करणार्‍या पीपल्स बँक प्रशासनाचा निषेध – शिवराम पाटील 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पिपल्स बँकेस ठोठावलेल्या दंडाची बातमी प्रसिध्द केल्याचा राग येवून पोलीसात दिलेली खोटी फिर्याद हा एक प्रकारे माध्यम स्वातंत्र्याची मुस्कुटदाबी करण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी मी बँक प्रशासनाचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी व्यक्त केली.
0