उत्तर महाराष्ट्र जळगांव

विद्यापीठांतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ ; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शनिवारी महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये/परिसंस्था मधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शनिवारी महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये/परिसंस्था मधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि.९ नोव्हेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ­ माफ करण्यात यावे ही अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली होती. या बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हाता- तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे बहुसंख्य पाल्य शेतकरी आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली. प्राचार्य एल.पी. देशमुख, दीपक पाटील,प्रा.नितीन बारी व इतर सदस्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने विद्यापीठाने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. आता खान्देशात अतिवृष्टीचे संकट लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, असे मत व्यक्त झाले. चर्चेअंती परिक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये/परिसंस्थां मधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे मार्च-एप्रिल/मे, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अंदाजे १ लाख ७५ हजार एवढी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही ह्या बैठकीत ठरले. या बैठकीस प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, दिलीप पाटील, प्रा.रत्नमाला बेंद्रे, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जे.बी.नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, तंत्रशिक्षणचे प्रभारी संचालक बी.पी.नाथे, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील आदी उपस्थित होते.

0