मुंबई राजकीय

महाराष्ट्रात आपलेच सरकार ; मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकच बसवणार- उद्धव ठाकरे

मुंबई: ‘आतापर्यंत पालखीचे भोई बनून होतो. आता तसं बनून राहणार नाही. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार. महाराष्ट्रात आपलंच सरकार बनणार,’ अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या आमदारांसमोर मांडली.त्यामुळे सेना आपल्या मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचे आजच्या सेना आमदारांच्या बैठकीत निष्पन्न झाल्याचे समजते . तर दुसरीकडे भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे . राज्यपालांच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. तर, शिवसेना आपल्या आमदारांचा कल जाणून घेत आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज मालाडच्या मढ येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली. ‘तुमच्याशी बोलता यावं म्हणून केवळ सर्वांना एकाच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा अजिबात प्रश्न नाही,’ असा विश्वास उद्धव यांनी आमदारांना दिला. त्याचबरोबर, युती अजून तुटलेली नाही,’ असंही उद्धव यांनी सांगितलं.

राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी राज्य भाजपनं बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यानंतर पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे. त्यात जो निर्णय होईल, त्याची माहिती दिली जाईल,’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर सांगितले . या बैठकीत विरोधी पक्षात बसण्याबाबतही चर्चा झाली असून त्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनाही कळवण्यात आल्याचं समजतं. या माध्यमातून भाजपनं शिवसेनेला एक प्रकारचा अल्टीमेटम दिल्याचीही चर्चा आहे.

0