उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

शेतकरी पित्याच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून दहावीत टॉपर असलेल्या विद्यार्थिनीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

भादली गावात शोककळा

जळगाव ;- गेल्या एक महिन्यापासून ओल्या दुष्काळामुळे हंगाम वाया गेल्याने आणि आपल्या पित्याची हलाखीची परिस्थिती पाहून विषारी औषध प्राशन करून १७ वर्षीय दहावीत ८८ टक्के प्राप्त केलेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज तालुक्यातील भादली येथे घडली असून तिचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला . याघटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून रुग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती .
यामिनी प्रमोद पाटील वय १७ असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती जळगावातील नंदिनीबाई महाविद्यालयात अकरावी सायन्सला शिकत होती . तिचे वडील प्रमोद पाटील हे शेतकरी असून त्यांची परिस्थिती वाईट असल्याने यामिनीला हि बाब खटकत होती . तिला आपल्या शिक्षणावर आईवडील खर्च करीत असल्याची चिंता सतावत होती . गेल्या एक महिन्यापासून ती आई वडिलांना शिक्षण सोडण्याचा विचार बोलून दाखवीत होती . तसेच शिक्षकदेखील तिला तू खर्चाची चिंता करू नको असा आधार देत होते . मात्र नियतीला काही औरच मंजूर असल्याने आज यामिनीचे आईवडील सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास लग्नाला गेले होते . दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ते घरी परतल्याने त्यांना यामिनीने घरातील पीक फवारणीचे थायमेट नावाचे विषारी औषध पिल्याचे सांगताच तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले . मात्र दुपारी चार वाजेच्या सुमारास यामिनी हिची प्राणज्योत मालवली . या घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे.

0