आरोग्य

गर्भावास्थेमध्ये महिलांनी कोणते मसाले खावेत

एखादी महिला गर्भावास्थेमध्ये असताना तिने काय खावे, काय खाऊ नये या बद्दल तिला निरनिराळे सल्ले सतत दिले जात असतात. अनेकदा, मसालेदार पदार्थ या नाजुक अवस्थेमध्ये टाळायला हवेत असा ही सल्ला ऐकायला मिळत असतो. खरेतर सर्वच मसाले गर्भावास्थेमध्ये टाळण्याचे काही कारण नाही. मात्र काही मसाले या अवस्थेमध्ये आवर्जून टाळायला हवेत, कारण यांचे दुष्परिणाम महिलेवर होऊन तब्येतीच्या लहान मोठ्या तक्रारी उद्भवू शकतात.
आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये मसाल्यांचे स्थान विशेष आहे. एखाद्या बेचव पदार्थामध्ये मसाल्यांचा वापर केल्यास तो बेचव पदार्थ देखील अतिशय चविष्ट बनतो. मसाले पदार्थाची चव, सुगंध खुलविण्यास सहायक असतात. तसेच पदार्थाला चांगला रंग देखील मसाल्याच्या वापराने येत असतो. त्याचबरोबर एखादा पदार्थ जास्त काळ टिकावा यासाठी देखील मसाल्यांचा वापर केला जात असतो. मसाले हे कधी अख्खे, तर कधी पूड तर कधी ‘हर्ब्ज’ च्या रूपामध्ये वापरले जात असतात.

गर्भावास्थेमध्ये खाल्ल्या जाऊ शकणाऱ्या मसाल्यांमध्ये हळद सर्वात जास्त फायद्याची आहे. हळद ही त्वचेसाठी उत्तम आणि वेदनाशामक आहे. हळदीमध्ये असलेले कुर्कुमीन हे तत्व शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करणारे आहे. दिवसातून आठ ग्राम हळद या अवस्थेमध्ये खाल्ली जाऊ शकते. गर्भावास्थेमध्ये आले देखील अतिशय लाभकारी आहे. या अवस्थेमध्ये होणारा ‘नॉशिया’, म्हणजेच उलट्या, मळमळ यावर आले उपयुक्त आहे. दररोज एक ग्राम आले या अवस्थेमध्ये खाल्ले जाऊ शकते. त्याचप्रमाणे काळ्या मिरीमध्ये क्रोमियम नामक तत्व असल्याने गर्भावस्थेनंतर उद्भविणाऱ्या मधुमेहापासून बचाव करण्यात हे तत्व सहायक आहे. अगदी थोड्या मात्रेमध्ये केले गेलेले काळ्या मिरीचे सेवन गर्भारशी महिलेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे इलायचीचे सेवनही या अवस्थेमध्ये केले जाऊ शकते.

मेथ्या, किंवा मेथी दाण्यांचे सेवन गर्भावास्थेमध्ये जास्त केले गेले, तर त्यामुळे गॅसेस, डायरिया किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मेथ्या या दिवसांमध्ये टाळणे चांगले. याचप्रमाणे खाद्यपदार्थांमध्ये जास्त हिंग वापरणेही टाळायला हवे. लसूण जास्त प्रमाणामध्ये खाल्ली गेल्याने देखील गॅसेसचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणांत सेवन टाळायला हवे.

0