उत्तर महाराष्ट्र जळगांव

जामनेरात खड्ड्यात पिकअप व्हॅन पलटी झाल्याने ४०० कोंबड्या दगावल्या !

जामनेर;- शहरात भुयारी गटारींसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावर माती टाकून तो बुजविल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली होती मात्र यात कोंबड्याना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन पलटी झाल्याने या अपघातात मात्र ४०० कोंबड्या दगावल्याची घटना आज सोमवार २ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील अराफत चौकात भुयारी गटारीच्या कामासाठी रस्त्याचे खोदकाम होत आहे. रविवारी ठेकेदाराने रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकले. त्यानंतर माती टाकून बुजण्यात आले. त्यापुढे खोदण्यात आलेल्या रस्त्याला लागून जलवाहिनी आहे. सोमवारी सकाळी नळाला पाणी सोडण्यात आल्यानंतर जलवाहिनी फुटली व जो खड्डा रविवारी मातीने बुजला होता. त्यात पाणी शिरल्याने वरील भाग भुसभुशीत झाला. सकाळी त्या रस्त्यावरून मालेगाव येथून कोंबड्या घेऊन येत असलेली पीकअप व्हॅन फसल्याने उलटली व त्याखाली दबल्याने सुमारे ४०० कोंबड्या मरण पावल्या.
शेख कामिल (राहणार अजिंठा ) यांचे हे वाहन असून, सुमारे ७० हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर याच ठिकाणी दोन ट्रॅक्टर फसल्याने काही काळ वाहतूक बंद पडली.

0