आंतरराष्ट्रीय

दिव्यांगासाठी बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी -प्रा.सी.एच .पाटील

जळगाव ;- दिव्यांगासाठी बहिणाबाईंच्या कविता प्रेरणादायी व उर्जा देणाऱ्या असून जीवन जगण्याचे तत्वज्ज्ञान सांगणाऱ्या आहेत. बहिणाबाईंचा दैवावर नाही तर देवावर विश्वास होता. तुझा उध्दार तुलाच करावयाचा आहे. असे प्रतिपान प्रा.सी.एच .पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थी संवाद कार्यशाळेचे आयोजन दि.३ डिसेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी मंचावर प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सत्यजित साळवे उपस्थिती होते.

प्रा. पाटील, पुढे म्हणाले की, संतांच्या अभंगांशी बहिणाबाईंच्या कविता अगदी जवळच्या आहेत. गीतेचे तत्वज्ज्ञान बहिणाबाईंनी सोप्या भाषेत आपल्या कवितांमधून सांगीतले आहे. त्यांच्या कविता जगण्याची कला शिकवतात. प्रा.पाटील यांनी आपल्या व्याख्यानात संतांचे अभंग, गीतेचे श्लोक आणि बहिणाबाईंच्या कवितेतील साम्य उदाहरणे देऊन स्पष्ट केले. दिलीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, दिव्यांग विद्यार्थ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा न्युनगंड ठेऊ नये. दिव्यांगासाठी विद्यापीठ जे-जे शक्य आहे ते-ते करण्याचा प्रयत्न करेल. अनेक सोयी-सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या आहेत. प्र.कुलगुरु,प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी समारोप करतांना सांगीतले की, विद्यापीठाने समावेशी केंद्रामध्ये अनेक प्रेरणादाई पोस्टर लावलेली आहेत. त्यातुन दिव्यांग विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळेल. भविष्यात समावेशी केंद्रात बहिणाबाईंच्या कवितांच्या ध्वनीफिती उपलब्ध करुन दिल्या जातील. यावेळी प्रा.माहुलीकर यांनी भारतातील आणि महाराष्ट्रातील दिव्यांगाच्या आकडेवारीसह सखोल माहिती दिली. सुरवातीस सहा.कुलसचिव, रामनाथ उगले यांनी दिव्यांगसाठीच्या सोयी-सेवा व सुविधा बाबात विस्तृत माहिती देत दिव्यांग विद्यार्थ्यांचे काय अधिकार आहेत याची माहिती आपल्या प्रस्तावनेतून दिली. सुत्रसंचालन प्रा.दिपक सोनवणे यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी आभार मानले.

दुपारच्या सत्रात रुसा अंतर्गत समावेशी शिक्षण संसाधन केंद्र सुरु असल्याचे केंद्राचे समन्वयक प्रा.राम भावसार यांनी सांगत, दिव्यांगासाठी केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा विषयी विस्तृत माहिती दिली. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. विवेक काटदरे यांनी प्रेरणादायी जीवनाची अनमोल गाथा या विषयावर बोलतांना मानवी जीवनात प्रेरणा अतिशय महत्वाची आहे. प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा विचार मांडताना प्रेरक अनुभव कथन करीत मार्गदर्शन केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, बी.पी.पाटील यांनी परीक्षा संदर्भात विद्यापीठाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी व सवलती दिल्या जातात या बद्दल माहिती दिली. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धुळे येथील विद्यावर्धीनी महाविद्यालयात दिव्यांग कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांसाठी संमंत्रकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी संमंत्रकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जळगाव, धुळे व नंदूरबार तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इतर जिल्ह्यांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमांतर्गत प्रवेश देण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतच्या विविध प्रक्रिंयाची माहिती करुन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी , प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.विवेक काटदरे उपस्थित होते. प्रा. चौधरी यांनी विभागाच्या कार्यपध्दतीची माहिती देतांना विद्यार्थी संख्या वाढीच्या दृष्टीने तसेच गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी विभागाद्वारे राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रम व केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रभारी कुलसचिव प्रा.पवार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामातील गुणवत्ता आणि शिक्षणाचा इतिहास सांगुन बहि:स्थ शिक्षणाच्या माध्यमातून विविध संधी व उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग कसे आत्मसात करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.काटदरे यांनी अध्ययनात येणाऱ्या अडचणी व शंकांचे समाधान करुन घेण्यासाठी तसेच कमी कालावधीत अधिक माहिती अगदी सहजतेने कशी आत्मसात करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमास ३५ प्राध्यापक व ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन व आभार सह.प्रा.मनिषा जगताप यांनी केले.

0