आंतरराष्ट्रीय

प्रेरणा अपंग विकास बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते विविध लाभार्थ्यांना लाभ व पुरस्कार वाटप…

चाळीसगाव – 1992 पासून 3 डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघातर्फे अपंग दिवस म्हणून घोषित करण्यात आला. मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या सामाजिक घटकांच्या समस्या समजून घेण्यासाठी या दिवसाची निवड केली आहे. आज जगातली दहा टक्के लोकसंख्या, म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने अपंग आहेत. अपंगांना समाजात मानाचे स्थान मिळावे, अपंग म्हणजे शारीरिक कमतरता न ठरता ते बलस्थान व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिव्यांग हा शब्द सरकार आणि समाजात प्रचलित केला. लवकरच खास दिव्यांग बंधू – भगिनींचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करून त्यांना आधार देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या केले.

ते प्रेरणा अपंग विकास बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव च्या वतीने सिंधी समाज मंगल कार्यालयात आयोजित बस पास वाटप व अपंग सर्टिफिकेट वाटप व दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी वीरशैव कंकय्या समाजाचे अध्यक्ष शिवलालजी साबणे, नगरसेवक अरुण मोतीलाल अहिरे, प्रियांका स्पोर्ट्स चे संचालक सचिन बोरसे, कवी गौतमकुमार निकम आदी उपस्थित होते.

आमदार मंगेशदादा चव्हाण पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी भाजपा राज्य व केंद्र शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या. ऑनलाइन प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे दिव्यांग बांधवांच्या नावाने बोगस योजना लाटणाऱ्यांवर आळा बसला. आमदार म्हणून शासनाचा एक घटक या नात्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी विविध ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी असणारा राखीव निधी हा कसा दिव्यांगांच्या कामांसाठी खर्च करता येईल यासाठी सर्वोतोपरी मदत व पाठपुरावा करेन असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते दिव्यांग बंधू – भगिनींना साहित्य, बसेस पास वाटप, दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे राहुल अहिरे, नीलकंठ साबणे, श्री पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

1+