उत्तर महाराष्ट्र जळगांव

जळगावात ७ व ८ डिसेंबरला पुरुषोत्तम करंडकाचे आयोजन

जळगाव – येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव ही शैक्षणिक संस्था निव्वळ खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वतंत्र ओळख प्राप्त केलेली संस्था आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आपला अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आणि के.सी.ई. सोसायटी संचलित आणि मु.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव पुरस्कृत कान्ह ललित कला केंद्र जळगाव यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2019 – 20 चे दि. 7 व 8 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
पुरुषोत्तम करंडकसारख्या महाराष्ट्रातील मानाच्या समजल्या जाणार्‍या स्पर्धेचे के.सी.ई. सोसायटी संचलित आणि मू.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव पुरस्कृत कान्ह ललित कला केंद्र जळगाव यंदा सलग चौथ्या वर्षी या स्पर्धांचे आयोजन करीत आहे. या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या तिनही विद्यापीठातंर्गत असलेले महाविद्यालय सहभागी होतात.
महाविद्यालयीन रंगभूमीवरील हे मोठे व्यासपीठ देण्याचे कार्य खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी गेल्या दोन वर्षापासून करीत आहे. या स्पर्धा दि. 7 व 8 डिसेंबर 2019 दरम्यान स्व.भैय्यासाहेब गंधे सभागृहात होणार असून, स्पर्धेत एकूण 8 संघांनी आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. 29 नोव्हेंबर गुरुवारी या स्पर्धेत सहभागी महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत मू.जे. महाविद्यालयात महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांचे प्रतिनिधी राजेंद्र नागरे आणि के.सी.ई.चे सदस्य चारुदत्त गोखले आणि सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे लॉट्स काढण्यात आले. सुरुवातीला पुण्याहून आलेले महाराष्ट्रीय कलोपासकचे प्रतिनिधी नांगरे यांनी पुरुषोत्तम करंडकाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. स्पर्धेच्या नियम व अटी संदर्भात सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. यानंतर स्पर्धेचे लॉट्स काढण्यात आले. यात स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला दुपारी 2 वाजता उद्घाटन झाल्यानंतर दु.2.30 वाजता इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च शिरपूर यांचे बायकोच्या नवर्‍याच्या बायकोचा खून, दु.3.30 वाजता डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाची इंटीरोगेशन, दु.4.30 वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाची ईदी, दु.5.30 वाजता कला, विज्ञान व पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ यांची 72 चे गणित या एकांकिका सादर होती. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांची खेळ, सकाळी 11 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांची मॅट्रीक, दुपारी 12 वाजता एम.जी.एस.एम. कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा यांची रंगबावरी, दुपारी 1 वाजता प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची असणं आणि नसणं ह्या एकांकिका सादर होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि. 8 डिसेंबर रोजी सायं. 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. लॉटस काढल्यानंतर के.सी.ई. सोसायटीचे सदस्य शशिकांत वडोदकर यांनी स्पर्धक संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेच्या आयोजनासाठी के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तरी महाविद्यालयीन तरुण – तरुणी, शहरातील रंगकर्मी, नाट्यरसिकांनी आपली उपस्थिती देवून या स्पर्धेचा नाट्यानंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

0