क्रिडा

टिटवाळयाच्या खेळाडूंनी पदके लुटून साजरी केली गोकुळअष्टमी

टिटवाळा – जैनेंन्द्र सैतवाल                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र युवा संघ कल्याण यांच्या वतीने, २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, रविवार, दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. वाणी विद्याशाळा, खडकपाडा, कल्याण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार तसेच गोकुळअष्टमीच्या दुग्धशर्करा योगा मुळे या स्पर्धेत ५२० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. टिटवाळा येथे विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण घेणाऱ्या ६५ खेळाडु या स्पर्धेत सहभागी झाले होते. २४० विद्यार्थ्यांमधून निवड केलेल्या या ६५ खेळाडूंनी या स्पर्धेत आपले कर्तुत्व सिद्ध केले व भरघोस पदके जिंकून गोकुळअष्टमीचा खरा सण साजरा केला. सहभागी झालेल्या ६५ विद्यार्थ्यांनी अनुक्रमे २५ सुवर्ण पदके, १९ रौप्य पदके तसेच २१ कांस्य पदके मिळवून जल्लोष साजरा केला. सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पदके मिळाल्यामुळे विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन या संघाला सर्वात जास्त पदके मिळविण्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला व द्वितीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह या संघाला देण्यात आले.
सदर स्पर्धेचे आयोजन व नियोजन महाराष्ट्र युवा संघाचे अध्यक्ष व राज्य युवा पुरस्कार विजेते अजित कारभारी सर यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावंत सर, आमदार नरेंद्र पवार साहेब, भारतीय थल सेना दलातील निवृत्त अधिकारी नरेंद्र पाटील सर, किमुरा शुकोकाई कराटे इंडिया चे अध्यक्ष व माजी नगरसेवक (शिहान) फैसल जलाल व कार्याध्यक्ष व प्रमुख प्रशिक्षक (रेन्शी) मोहन सिंग हे उपस्थित होते.
विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन चे मुख्य प्रशिक्षक व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी सर यांनी या संघाचे नेत्रुत्व केले तर क्रीडाप्रशिक्षक हरीष वायदंडे सर यांनी या स्पर्धेत पंच म्हणून कार्य केले.
टिटवाळा सारख्या ग्रामीण भागातील लहान लहान खेळाडु विविध स्पर्धांत सहभागी होऊन यश संपादन करत आहेत. मुलांच्या मनात खेळाची आवड निर्माण करून त्यांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक विनायक कोळी सर करत आहेत. गोकुळअष्टमीच्या सणाच्या दिवशी या बाळगोपाळांनी इतकी भरघोस पदके मिळविल्यामुळे टिटवाळा वासियांच्या वतीने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

1+