आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

जिल्हाधिकाऱ्यांनी एफडीआयकडे लक्ष देण्याची मागणी

जळगाव : प्रतिनिधी
निकृष्ठ, भेसळयुक्त पदार्थ विक्रीस आळा घालून नागरिकांच्या निरामय आरोग्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या तोकड्या अधिकार्‍यांच्या फळीमुळे भेसळखोरांना लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.  तर ज्या अन्न भेसळ अधिकार्‍यांची जबाबदारी आहे ते मात्र स्टॉप कमी असल्याचे भासवित असून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे करुन जबाबदारी झटकत आहेत. तर यातील अनिल गुजर नामक इन्स्पेक्टर ‘सेटलमेंट’ करुन आपली आर्थिक पोळी भाजत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भविष्यात घातक खाद्यपदार्थांमुळे दुर्दैवी घटना  होऊ नये म्हणून ‘जिल्हाधिकारी साहेब एफडीआयकडे थोडे लक्ष घाला’ अशी रास्त अपेक्षा जळगाव वासियांकडून व्यक्त केली जात आहे. 
सध्या बाजारपेठेमध्ये दिवाळीची धामधुम सुरु आहे. त्यातच जिल्ह्यात बनावट खवा विक्रीचा काळाकुट्ट इतिहास आहे. ही भेसळयुक्त निकृष्ठ दर्जाची खाद्यपदार्थ विकणारी, नफेखोरांवर चाप बसविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यरत असते. मात्र या विभागाकडे अन्न सुरक्षा अधिकार्‍यांची १५ तालुक्यांसाठी तिनच अधिकारी असल्याने या अधिकार्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा बनाव मात्र या विभागातील अधिकार्‍यांकडून केला जात आहे. वर्षभर फारसे काम नसतांनाही किमान दिवाळीत तरी या अधिकार्‍यांनी आपली नैतिक जबाबदारी जोपासत जळगाव वासियांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ऐन दिवाळीत तरी पोटतिडकीने व जबाबदारीने कर्तव्य बजवावे अशी अपेक्षा रास्त आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांची कमतरता असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांनी विशेष बाब म्हणून लक्ष देवून या विभागाकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून महसूलच्या कर्तव्यनिष्ठ कर्मचार्‍यांची हंगामी नेमणूक करावी, जेणेकरुन भेसळखोरांना चाप बसेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
            अधिकारी कमी, त्यात
            एकाची सेटलमेंट भारी 
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे कमी अधिकारी असून त्यातील अनिल गुजर या इन्स्पेक्टर महाशयाचे कार्य अन्न भेसळ रोखणे नसून सध्या दिवाळीच्या सणासुदीत हे महोदय बाजारपेठेत आपल्या ‘अर्थ’पूर्ण  संबंध जोपासत अप्रत्यक्षरित्या भेसळीला प्रोत्साहन देत जिल्हावासियांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यांच्यावर रावेर यावलची जबाबदारी असून जळगावची मात्र प्रभारी जबबादारी आहे. दरम्यान या भेसळीमधून ऐन सणासुदीत एखादी विपरीत घटना घडल्यास त्या घटनेला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न सुद्धा उपस्थीत होत असून या आर्थिक साटेलोटे करणार्‍या अधिकार्‍यावर जरब बसविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
1+