उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

बहिणाबाईचा दृष्टिकोन समोर ठेवून महिलांनी संघर्ष करा रडायचे नाही तर लढायचे – ना. पंकजा मुंडे

भुसावळ (निलेश फिरके) – खान्देश कवियत्री बहिणाबाई या अशिक्षित असून सुद्धा त्यांनी जीवन कसे जगावे याबद्दल संपूर्ण महिला वर्गाला एक धडा दिला आहे. बहिणाबाईंच्या आदर्श कर्तुत्वाचा ठसा प्रत्येक महिलांच्या मनात असला पाहिजे म्हणूनच महिलांनी बहिणाबाईंचा दृष्टिकोन समोर ठेवून संघर्ष करा,  जीवनात लढाई चे तसे हे स्त्रीला उपजत असतं म्हणून आता रडायचं नाही तर लढायचं असा संदेश ना. पंकजा मुंडे यांनी दिला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दि. 8 रोजी गुरुनाथ फाउंडेशन तर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रसंगी व्यासपीठावर पर्यटन मंत्री  ना जयकुमार रावल, सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्ष खा. रक्षा खडसे , माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. संजय सावकारे,  कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. राजू मामा भोळे , आ. चंद्रकांत सोनवण,  आ. किशोर पाटील , जि प अध्यक्ष उज्वला पाटील , जि प शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे व भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे,प.स.समिती सभापती प्रीती पाटील ,व उपनगर अध्यक्ष लक्ष्मी मकासरे ,सौ रजनी सावकारे,गटनेते हाजी मुन्ना तेली , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी पुढे बोलतांना ना. मुंडे म्हणाल्या  की खान्देशच्या  सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा व बहिणाबाई चौधरींच्या सन्मानार्थ आणि बचत गटांच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा बहिणाबाई महोत्सव कार्यक्रम आहे. खा. रक्षा खडसे यांचे कार्य उल्लेखनीय असून सलग पाचव्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल त्यांचे कौतुक केले. बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी खानदेश कवयत्री बहिणाबाई यांनी कोणतेही शिक्षण नसताना या रचना केल्या त्या संस्कृती व संस्काराने ओतप्रोत आहे कोणतेही शिक्षण नसताना या रचना त्यांनी केल्या त्या आजही एकविसाव्या शतकात आपल्याला अत्यंत मार्गदर्शक अशाच ठरत आहे बहिणाबाईंच्या काव्य ओळींचे वाचन करीत ना. मुंडे यांनी कठीण  परिस्थितीत महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेत असते तिच्या मध्ये सुद्धा ताकद आहे हेच बहिणाबाईंनी दर्शविले आहे. स्त्रियांमध्ये बचत करण्याची शक्ती अफाट असते म्हणून ती आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. यासाठी बचत गटांना ताकद देण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे बचत गटाच्या महिला स्वाभिमानी असून 100 टक्के कर्ज परत करतात. कोणाचेही कर्ज ठेवणे हे महिलांना जमत नाही ते प्रामाणिकपणे  व कष्टाने आपले कार्य करीत असतात यापुढे देखील शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार सुमतीबाई सुरळकर योजनेच्या माध्यमातून या चळवळीला ताकद देण्याचे काम यापुढेही करणार असल्याचे सांगितले.

नाथा भाऊंचा आदेश शिरसावंद्य

आ. खडसे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांच्या समर्पणाची पावती म्हणून  त्यांच्या पाठीवर थाप पडल्यशिवाय राहणार नाही. मंत्रिमंडळात ते कोणालाही आदेश देऊ शकतात तो आदेश आम्हाला शिरसावंद्य असल्याचे त्या म्हणाल्या.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार – खासदार रक्षा खडसे

यंदाचे 5 वे वर्ष असून यावर्षी सुमारे साडेतीनशे बचत गटांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहे. यापुढे देखील याच ताकदीने बचत गटांसाठी व महिलांच्या सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी कार्य करणार  असल्याचे खा. रक्षा खडसे यांनी प्रास्ताविकात सांगितले. खा खडसे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलानी उभारलेल्या उदयोगाना चालना मिळावी आदी बाबत सविस्तर माहिती दिली.
आसोदा पर्यटक स्थळ म्हणून नावलौकिकास यावे यासाठी  बहिणाबाई यांच्या निवासस्थानाची विक्री करुन त्या ठिकाणी बहिनाबाई यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. जयकुमार रावळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की खा. रक्षा खडसे यांनी सलग चार वर्षे केलेला प्रयत्न कौतुकास्पद असून या माध्यमातून खान्देश संस्कृती महिला सबलीकरण सहित लोककला यांना प्रोत्साहन मिळाले आहे. बहुआयामी अशा या कार्यक्रमातून समाजाला प्रेरणा देण्याचे काम खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे असे म्हणून कौतुक केले .सारंगखेडा येथील चेतक महोत्सव मध्ये खान्देशातील बचत गटांना स्टॉल लावण्यासाठी पर्यटन विभागातर्फे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही ना.जयकुमार रावळ यांनी यावेळी दिली. बचत गटांना काम देण्याचे व्यासपीठ म्हणून या महोत्सवाकडे बघितले जाते पर्यटनाच्या माध्यमातून खानदेशातील काळाच्या ओघात दडलेला इतिहास उजागर करण्याचे कार्य करणार असून त्यासाठी मुक्ताइनगर येथील वॉटर पार्क करीता पाच कोटी रुपये  मंजूर केले तसेच असोदा येथील बहिणाबाईंच्या घराचे नूतनीकरण व विस्तारीकरण करून त्या ठिकाणी भव्य असे बहिणाबाईंचे स्मारक उभारणार असून त्यासाठी पर्यटन विभागामार्फत निधी देण्यात येणार आहे, असेही म्हणाले .

 

तालुकास्तरीय आयोजन करावे – ना गुलाबराव पाटील
सर्व समाजातील महिलांना स्वयंपूर्ण बनवून सक्षमीकरणा सोबतच जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक चळवळीला गती मिळते बचत गटाच्या माध्यमातून उद्योगांना चालना मिळते म्हणून असे महोत्सव प्रत्येक तालुक्यात घेतल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात वाव मिळेल अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली . हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे कुठल्याही पक्षाचा समाजाचा उपक्रम नसून महिलांना दिशा  दाखवणारा उपक्रम आहे आशा वर्कर अंगणवाडी महिलांचा मागण्या मंजूर करणार  असून त्यांच्या मानधन किंवा वेतन मध्ये  वाढ होईल  असे त्यांनी सांगितले .
सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये जळगाव जिल्हा नेहमी अग्रेसर ठरला आहे या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून बचत गट माध्यमातून महिला सबलीकरण करण्यासाठी चांगले व्यासपीठ दिले आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून बचत गट देशभरात गाव पातळीवर पोहोचला आहे बचत  गटातील महिलांनी कौशल्याने तयार केलेल्या वस्तू व मालाचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट असतो मात्र विक्री व्यवस्थापन साठी व्यासपीठ मिळत नाही म्हणून खा. खडसे यांनी गेल्या चार वर्षांपासून या बचत गटांची दखल घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे मागील वर्षी सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची उलाढाल झाली होती त्यापेक्षा जास्त उलाढाल म्हणजेच सुमारे एक कोटीच्या वर उलाढाल या महोत्सवात होणार असल्याची आशा आ. एकनाथराव खडसे यांनी यावेळी व्यक्त केली .
दरम्यान कार्यक्रम स्थळी दुपारी दोन वाजून पंचावन मिनिटांनी मान्यवरांचे आगमन झाले . तदनंतर बहिणाबाई नगरी च्या प्रांगणात प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांचे हस्ते  पुष्पहार करून वंदन करण्यात आले तद्नंतर  यावल तालुक्यातील  साखळी येथील  चंदू नेवे  यांनी  बहिणाबाई  यांचे रांगोळी द्वारे  चित्र  साकारले  त्याची पाहणी केली. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच डोंबिवली येथील बहिणाबाई उद्यान साकारणारे ग्राफिक डिझायनर सुनील चौधरी यांच्या सचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन , तसेच कवयित्री बहिणाबाई यांच्या झोपडी व  भव्य अशा दळणाचे जाते यांची पाहणी केली. ग्रामीण  भागातील शेतक-यांचे जीवन दर्शविना-या वस्तु व शेतकरी बांधवांनी सजविण्यात आलेली बैल गाडी आदि साहित्याची पाहणी केली. तद्नंतर पुणे येथील  विलास करंदीकर  यांच्या कल्पनेतून  साकारलेले  आठवणीतील आजीची भातुकली या साहित्याचे प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन ना. मुंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष चकली तयार करून करण्यात आले. खानदेश ची संस्कृती दर्शविणारे खानदेश एक दृष्टिक्षेप या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन ना. गुलाबराव पाटील, ना. रावळ , कुलगुरू पी.पी.पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर तीन वाजून दहा मिनिटांनी मान्यवरांचे आगमन झाले तदनंतर दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. तसेच कार्यक्रमांचे प्रारंभी अहिल्यादेवी व के.नारखेडे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालबद्ध व स्वरबद्ध पद्धतीने बहिणाबाई यांच्या कवितांचे सादरीकरण केले. तर मंजुषा पात्रीकर यांच्या ग्राहक दृष्टी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच समाजात कठीण परिस्थितीतही मात करून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्राध्यापक कमल पाटील ,दिव्यांग मीनाक्षी निकम, धनुर्विद्या प्रावीण्य प्राप्त फैजपुर येथील सावरी महाजन या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थिनींना गौरवण्यात आले. मुंबई येथील यामिनी लोहार,शैला वाघुळदे, शोभा पाटील यांच्यासह सुमारे 40 महिलांना बहिणाबाई पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश कुलकर्णी प्रा .जतीन मेढे ,प्रा.डॉ.  सुनील नेवे, उज्वल सराफ यांनी केले ,तर प्रास्ताविक गुरुनाथ फौंडेशनच्या अध्यक्षा खा.रक्षा खडसे यांनी केले तर आभार नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

0