जळगांव / प्रतिनिधी
बहिणाबाई चौधरींच्या माहेरच्या नातलगातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तीमत्त्व पॅराशूट जम्पिंगच्या खेळाडू शीतल महाजन यांनी भवरलालजी जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. आदरणीय मोठेभाऊ व अशोकभाऊ यांच्यामुळे आपला विश्वविक्रम कसा साध्य झाला. विश्वविक्रम करून आल्यावर श्रद्धेय मोठ्याभाऊंनी माझं केलेले अभिनंदन या गोष्टी सांगताना शीतल महाजन यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. भाऊंच्या स्मृतिदिनी जागविलेल्या या आठवणी…
मूळ जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरींचे नातू कमलाकर महाजन यांची कन्या आहे. ती सन २००४ पासून पॅराशुट जंम्पिग या खेळाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करते. तिचा पॅराशुट जंम्पिग हा खेळ म्हणजे, नियमित उंचीवरुन उडणाऱ्या विमानातून ठरवून जमिनीकडे उडी मारणे. नंतर योग्य त्या उंचीवरुन पॅराशुटचा वापर करीत जमिनीवर उतरणे. शितल आपल्या खेळाविषयी आणि प्रारंभाच्या संघर्षाविषयी सांगत होती तेव्हा अशोक जैन यांचा आदराने उल्लेख करीत तीने आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग सांगितला. जळगावच्या जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्रध्देय डॉ. भवरलाल जैन यांच्या औदार्याचा या पूर्वी जाहिर न केलेला उल्लेख तीने सर्वांच्या साक्षीने केला. शितल म्हणाली, २००४ मध्ये मी जेव्हा पॅराशुट जंम्पिग खेळात प्रवेश केला तेव्हा अशा प्रकारच्या खेळात सहभागी होणारी मी एकमेव भारतीय महिला होते. त्यावेळी माझ्याकडे स्वतःचा पॅराशुट नव्हता. आ. भवरलालजी यांना मी हा विषय सांगितला. जर स्वतःचा पॅराशुट असेल तर मी विश्वाला गवसणी घालणारे विक्रम करु शकेन असे म्हणाली. माझ्या मागणीवरुन आदरणीय भवरलालजी यांनी मला स्वतःचा पॅराशुट उपलब्ध करुन दिला. भवरलालजींच्या या औदार्यामुळे मी पुढील काळात अनेक विक्रम करु शकले, असे शितल म्हणाली.
जैन उद्योग समुहाने मला पॅराशुट दिला हे सुध्दा माध्यमांना माहित नाही, असे सांगत तीने जागतिक विक्रमांची माहिती दिली. शितलने दि. १७ सप्टेंबर २०१७ पर्यंत ७०० पॅराशुट जंम्प केलेल्या आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त १३,५०० फुटावरून आणि त्यातील काही १८,००० फुटावरून व एक पॅराशुट जंम्प ऑक्सिजनच्या सहाय्याने ३० हजार फुटांवरून केली आहे. जगातील सात खंड उत्तर ध्रुव (आर्क्टिक), दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका), भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे पॅराशुट जंम्प करणारी शितल एकमेव भारतीय महिला आहे. पॅराशुट जंम्पिंग प्रकारात शितलने १७ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रम केलेले आहेत.
शितल महाजन यांचा हा खेळ जेवढा जास्त रिस्की तेवढाच तो खर्चिक आहे. प्रत्येकवेळी नवे धाडस करायचे तर तिला प्रायोजक शोधावा लागतो. जळगावचा जैन उद्योग समुह नेहमी तिच्या मदतीला पुढे सरसावतो. शितलने अजून एक आठवण सांगितली. ती म्हणाली, मे २०१७ मध्ये मला कॅलिफोर्नियात (यूएसए) ३०,५०० फुटांवरून हॅलो जंम्प (हाय अल्टीट्युड लो ओपनिंग जंम्प) प्रकारात सहभागी व्हायचे होते. यात मला अडचण होती. मी ती अडचण अशोकभाऊ जैन यांना सांगितली. त्यांनी ती अवघ्या ४ दिवसांत सोडवून मला कॅलिफोर्नियात जायला मदत केली. शितलने जाहिरपणे सांगितलेल्या या दोन्ही आठवणी जैन समुहाच्या औदार्याच्या पूर्वी अन टोल्ड स्टोरिज होत्या हे मात्र तितकेच खरे…
शब्दांकन – किशोर कुळकर्णी