Batmidar
आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव महाराष्ट्र

सर्पदंश झालेल्या बालिकेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

शासकीय वैद्यकीय महाविद्यायतील यंत्रणेचे प्रभावी यश
जळगाव / प्रतिनिधी

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील दहा वर्षीय बालिकेला घरी झोपलेली असताना सर्पदंश झाल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरु झाले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तब्बल ३४ दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर बालिकेचा जीव वाचून तिला डिस्चार्ज देण्यात यश मिळाले आहे. यामुळे बालिकेच्या परिवाराने रुग्णालयातील यंत्रणेचे आभार मानले.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात राहणाऱ्या १० वर्षीय बालिकेला १७ जानेवारी रोजी अतिविषारी सर्पाचा दंश झाल्याने तिची तब्येत अत्यवस्थ झाली होती. स्नायू कमजोर होऊन श्वास थांबत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले होते. नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात १८ जानेवारी रोजी संध्याकाळी तिला उपचारकरीता दाखल केले. बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागातील तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता उजव्या पायाच्या पंजाला दंश झाल्याने मोठी सूज आलेली होती. दम लागत होता.

तत्काळ तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सूज वाढत असल्याने तिच्या शरीरावर पोटात रक्तस्राव होणे आदी दुष्परिणाम  सुरु झाले होते. तिला अँटिबायोटिक आणि इतर औषधी सुरु  झाली. या  गुंतागुंतीच्या उपचाराच्या दहाव्या दिवशी सकारात्मक लक्षणे दिसू लागल्यावर शल्यचिकित्सा विभागाने “स्किन ड्राफ़टींग” हे अद्ययावत उपचार यशस्वीरीत्या केले. यात पायाची दंश झालेली जागा खराब झाल्यामुळे मांडीची कातडी काढून तिला पायाच्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करण्यात आली. यानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.

अखेर २२ फेब्रुवारी रोजी ३४ व्या दिवशी तिला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या उपस्थतीत डिस्चार्ज देण्यात आला. बालिकेवर बालरोग विभाग, औषधवैद्यक शास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात यश आले. यासाठी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. प्रशांत  देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. गिरीश राणे, डॉ. बालाजी नाईक, डॉ. मानसा सी., डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. जयश्री गिरी, डॉ. विश्वा भक्ता यांनी परिश्रम घेतले.

एरंडोल येथील घटना दुर्दैवी; दुर्घटना घडल्यास तत्काळ उपचारासाठी येणे महत्वाचे

बऱ्हाणपूर येथील बालिकेचा जीव वाचविण्यात आमच्या यंत्रणेला यश आले. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांची साथ बालिकेला लाभली. दोन दिवसांपूर्वी  एरंडोल येथे १७ वर्षीय युवतीला सर्पदंश झाल्यावर तिला दवाखान्यात नेण्याऐवजी देवस्थानात नेण्यात आले. त्यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  वेळेवर आणले असते तर बऱ्हाणपूर येथील बालिकेप्रमाणे हि युवती देखील वाचू शकली असती.  कुठलीही दुर्घटना घडल्यास रुग्णाला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी आणले पाहिजे अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केली.

Related posts

माझी वसुंधरा अंतर्गत ; अमळनेर नगर परिषद तर्फे सायकल रॅली व वृक्षारोपण

Batmidar

जिल्ह्यात आज पाठविलेल्या अहवालात ४०८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले

Batmidar

शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल

Batmidar
error: Content is protected !!